मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......
नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया? तुम्हाला मुलबाळ नाही का?
त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय, परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय! कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल.
माणूस इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........
मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट, न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच .................
No comments:
Post a Comment