Jayesh Gujrati's Blog (in Marathi): प्रेमपत्र

Search

Sunday, April 29, 2012

प्रेमपत्र

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. 

तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचे. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' 


मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. एवढंच काय, आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही. फक्त कामांपुरतंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलणं व्हायचं. आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करते, तितकाच तू मला आठवत राहतोस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतोस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. 

जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतास. आजही मला तू हवा आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. कदाचित या वेडीचं नावसुद्धा तुला माहीत नसेल. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करते.


                                                                              - तुझीच वेडी

No comments:

Post a Comment

Read This Heart Touching Stories