कधी कुठुन तो येईल आणि कचकचुन चावेल याचा नेम नव्हता. अख्खी रात्र अशीच
घाबरत, या कुशीवरुन त्या कुशीवर काढली. झोप अनावर झाली होती पण.. खोलीत
कुठेतरी तो आहेच... या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहीला होता.
त्या पुर्वी त्याला इतक्या स्पष्ट, जवळ कधीच पाहीला नव्हता. पण काल रात्री
मात्र.... एकाचे दोन.. दोनाचे चार... मग मात्र मला आणि माझ्या मैत्रीणीला
हातात चप्पल घ्यावी लागली.
इतक्या
महिन्यानंतर गप्पा रंगात आलेल्या असताना रंगाचा भंग करायला तो अचानकच कुठुन
तरी यायचा. पहाटे पाच-सहा पर्यंत हा चोर-पोलिसाचा खेळ चालुच होता. माझ्या
आयुष्यात मी त्याला काल प्रथमच पाहिलं. पण रात्रभर त्याला आणि त्याच्या
फ़ौजेला शोधाशोधीच्या त्रासाचीही नंतर गंमत वाटु लागली. सकाळी पाच - सहा
नंतर मात्र तो आणि त्याची फ़ौज बहुदा दमुन झोपली. तसंही बर्याच जणांची आम्ही
रात्रभर पाण्यात टाकुन, चप्पलेने वगैरे कत्तलच केली होती. पण पहाटे पर्यंत
आम्ही लढवलेली खिंड उद्या नक्कीच "पेस्ट कंट्रोल" वाल्या काकांच्या हाती
द्यायची असं एकमताने ठरवुन... "ढेकुणां" बरोबरची लढाई आम्ही संपवली.
माझं घर कोकणात असल्यामुळे, जन्मापासुन १८-१९ वर्षांत घरातील, उंदीर, घुस,
पाल, डोंगळे, आधेलं, विंचु, इंगळी, गोम (घोण), नाकतोडा, रातकिडा, वेगवेगळे
किटक..इत्यादी प्राण्या-पक्ष्यांशी दोस्ती झाली होती. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये
ही मंडळी हमखास घरी भेटायला यायची. अजुनही पेस्ट कंट्रोल नावाचा प्रकार
तिकडे वापरात आला नसल्यामुळे... आलेल्यांचं स्वागत आणि गेलेल्यांचे आभार
मानुन सगळे गुण्यागोविंदाने राहात होतो. (पाहुण्यांसाठीही हेच लागु होतं.)
पण या आमच्या ग्रुपमध्ये "ढेकुण" मात्र नव्हता. काल एकदाची त्याचीही
चांगलीच ओळख झाली. "घर आमचं पण आहे!" हे वाक्य हे सगळेजण वारंवार मला
जाणवुन देतात. तेव्हा... "नांदा पण सुखाने आणि जगा व जगु द्या!" हे एकच
वाक्य म्हणण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.
(सुचना: पुर्ण आयुष्य
शहराच्या झगमगाटात आणि फ़िनाईल ने पुसलेल्या चकचकीत फ़रशांवर गेलेल्या
व्यक्तींना कदाचित हे वर्णन रुचणार नाही. परंतु, कोकणातील शेणाने
सारवलेल्या जमीनींना, मातीने लिंपलेल्या भिंतींना आणि तिथल्या घरगुती
प्राणीसंग्रहालयाला ज्यांनी अनुभवलं आहे.. अशांना नक्कीच हे सर्व प्राणी
’मैत्र जीवांचे!" वाटतील यात शंका नाही.)
No comments:
Post a Comment